भोगले जे दुःख त्याला, सुख म्हणावे लागले
एवढे मी भोगिले की मज हसावे लागले

- सुरेश भट

Tuesday, November 2, 2010

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !

0 comments
दिवाळीचे दिवस! दिवाळी अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपली आहे. कुणी कामे संपवून घरी जाण्याच्या नादात आहेत. कुणी खरेदी करण्यात मग्न आहेत. सगळीकडे नुसती गडबड चालू आहे. लहान मुले फटाके उडवण्याची स्वप्ने पाहतायत, स्त्रियांचा साड्या-नवीन कपडे इ.कडे कल आहे. बाजारपेठेत नवनव्या वस्तु दाखल झाल्या आहेत. पणत्या, रांगोळ्या, निरनिराळे आकाशदिवे, सौंदर्य प्रसाधने, खाण्या-पिण्याच्या गोष्टी!

तर ही आहे तुमच्या-आमच्या सारख्या लोकांची दिवाळी! प्रत्येकजण आपल्या कुवतीप्रमाणे दिवाळी साजरी करत असतो; मग त्यासाठी काही करण्याची त्याची तयारी असते. याच्या पलीकडे जाऊन अनेक लोक असे असतात, ज्यांच्या दोन वेळेच्या जेवणाचीसुद्धा भ्रांत असते. त्याना दिवाळी सारखे सण परवडण्याच्या पलीकडे असतात. असे अनेक लोक आपल्या अवती-भवती असतात; आपण त्याना कधी आपुलकीच्या नजरेने पाहतो का? आपण त्याना अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद देऊ शकतो, पण आपल्याला अशा लोकाबद्दल काहीतरी करण्याची ओढ असली पाहिजे.

माझ्यामते, आपण जर आपल्याला त्यांच्या जागी ठेऊन पाहिलं, तर त्यांच्या मनाची आपल्याला जाणीव होईल. या जगात येण्याचा जसा प्रत्येकाला हक्क आहे, तसा हे जीवन इतरांसारखे जगन्याचाही आहे. थोडाफार पैसा आपल्याकडे असला म्हणजे आपण सुखात जगावे आणि अशा गरीब लोकाना त्यांच्या दैवावर सोडून द्यावे हे कितपत योग्य आहे? त्यानाही मने आहेत, अन् त्याना सुद्धा आपल्यासारखे सण साजरे करण्याचा अधिकार आहे. आपण जर त्याना आपल्या आनंदात सामावून घेऊ शकलो, तर किती बरे होईल? आणि मानवतेचा पुरस्कार करत साजरी केलेली दिवाळीच खरी नाही का? विचार करा, आणि निदान एका तरी कुटुंबाला-जे दिवाळी साजरी करु शकत नाहीत, त्याना थोडा हातभार लाऊन त्याना सुद्धा आपल्या आनंदात सामावून घ्या हीच या दिवाळीला तुम्हा सर्वाना विनंती!

ही दिवाळी आपल्या सर्वाना सुखाची-समृद्धीची आणि भरभराटीची जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!