भोगले जे दुःख त्याला, सुख म्हणावे लागले
एवढे मी भोगिले की मज हसावे लागले

- सुरेश भट

Wednesday, December 29, 2010

'तो' भिकारी

पुन्हा पहिला तो भिकारी परवा
दिमाखात निघालो होतो मी...अन् कमी झाला माझा चालण्याचा वेग
पुन्हा पुन्हा मी त्याला तिथे पहातो,
जशी सवयच लागली आहे...
मला तिकडे पाहण्याची, अन् त्याला तिथे उभं राहण्याची!
प्रत्येकवेळी तो आशाळभूत पणाने माझ्याकडे पाहतो
अन् मी तसाच निघून जातो
त्याला माहीत आहे, मी रोज असाच निघून जाईन
पण तरीही तो माझ्याकडे पाहतो आजसुद्धा!
कधी काही बोलणे नाही, कधी हातवारे नाही
कदाचित तोसुद्धा थकला असेल...भीक मागून!!
ना खोकल्याचा त्रास वाटतो, ना तापाचे भय
ना उन्हाची तमा, ना पावसाची फिकीर
फक्त पोटातल्या आगीची तणतण...जीवघेणी!
त्याच्याकडे मी पाहतो अन् आठवतो 'तो' दिवस
ज्यावेळी मी पाण्याने भूक शमवली
पोट पाण्याने भरता आलं असतं तर किती बरं झालं असतं?
असा विचार मी फक्त एकदा केला होता,
पण त्याने आजवर कित्येकदा केला असेल?
सगळं आठवतं अन् मी पुढे सरसावतो..आपोआपच
त्याला पैसे देण्यासाठी..त्याचा चेहरा खुलतो
पैसे घेण्यासाठी तो हात पुढे करतो अन् त्याचे डोळे पाणावतात
म्हणतो दिवसभरात कोणी काही दिलं नाही...
मी गहिवरुन जातो...त्याच्या नशिबाला पाहून!
इथे एका वेळेची भ्रांत आहे लोकाना..
आणि आम्ही तीन-तीनदा खाउनसुद्धा भुकेलेले असतो!
वाटतं आणाव्यात सगळ्या काळ्या पैशाच्या तिजोर्‍या उचलून
आणि खायला घालावं अशा गरजूना
कारण..पाण्याने तहान भागते...भूक नाही!!

0 comments: