भोगले जे दुःख त्याला, सुख म्हणावे लागले
एवढे मी भोगिले की मज हसावे लागले

- सुरेश भट

Wednesday, January 26, 2011

काहीतरी करायला पाहिजे...


     आज संध्याकाळची गोष्ट! मी ऑफिसला निघालो होतो. डांगे चौकात सिग्नल लागला म्हणून थांबलो. लगेच माझ्या पुढेच उभा असलेला एक ट्रॅफिकवाला माझ्याकडे आला. त्याच त्याच कायमच्या गोष्टी..लायसन्स आहे काय, गाडीची कागदपत्रं वै.वै.

मला म्हणाला, "PUC?"..मी म्हटलं "नाही!". लगेच "साईडला ये" म्हणाला. मी गेलो.

मग नेहमीचं Negotiation चालू झालं..पहिल्यांदा १०००, नंतर ५००, नंतर ३००...

शेवटी मला म्हणाला, "तू किती देऊ शकतोस?"

मी म्हटलं "५०"! त्याला असा राग आला की, जसा काही मला मारुनच टाकणार होता.

मला म्हणाला, "मग ठीक आहे...PUC नसताना १००० रु दंड भरावा लागतो..तो भर आणि लायसन्स घेऊन जा".

मी म्हटलं, "ठीक आहे. माझी बाइक पण घेऊन जा." मी ठरवलं होतं, की ऑफीसला आज मस्त दांडी मारायची पण याची वाटच लावायची.

मग पुन्हा आला...मला म्हणाला, "देऊन टाक आहेत तेवढे!" बहुतेक माझी पण वेळ आज वाईट होती...बरोब्बर पाकीट उघडलं आणि १०० ची नोट बाहेर दिसली. मग तो जरा जास्तच नाटक करू लागला. तोपर्यंत ऑफिस मधून बॉसचा फोन! मी विचार केला पुन्हा कधीतरी याला बघू...शेवटी आपली सुद्धा चुक आहेच. फक्त आळसापोटी PUC नव्हतं काढलं, आणि शिक्षा भोगावी लागली. पहिल्यांदा जाउन PUC घेतलं! असो.

तर या निमित्तानं सांगायचं हे आहे की, पार्ट्या करून २००० गेलेलं काही वाटत नाही हो; पण या हरामखोराना फुकटचे १०० जरी दिले की फार वाईट वाटतं. कदाचित माझ्यासारखीच अनेक लोकांची हाय लागत असेल साल्याना.

माझ्याकडे होते पैसे म्हणून दिले, ज्याच्याकडे नाहीत त्यानं काय करायचं? कायदे पाळले पाहिजेत, पण या भ्रष्ट लोकाना कळणार कधी आणि कसं? हा ईतिहास आहे की जर तुम्ही System बदलायला गेलात तर System च तुम्हाला बदलून टाकते. पण शेवटी नालायक System च्या विरोधात गेलो नाहीत, तर उद्या आम्ही 'आम्ही' राहू शकणार नाही; मी आता ठरवलंय या आणि अशा अनेक गोष्टीना वाचा फोडायची. ते सुद्धा अगदी कायद्यात राहून!! आणि शेवटी नाहीच जमलं तर आहेच की आपला 'आखरी रास्ता'! आणि आम्हाला जवळून ओळखणार्‍याना माहीतच आहे, की तो 'आखरी रास्ता' काय आहे ते! लिखाणाच्या माध्यमातून सुद्धा माझा पुढील काही दिवस याच विषयावर भर राहील. बघुया आम्हाला बदलता येता की नाही ते System ला. शेवटी साथ तुमच्या सारख्या हितचिंतकांची हवी आहेच!! भेटू लवकरच........

3 comments:

epundit said...

आशिष,

तू म्हटल्याप्रमाणे पीयुसी नसणे हे तुझी चूक होती.आपण लोकं निष्काळजी असतो म्हणून पळवाटा शोधतो,पोलीस काय रे? ते फायदा घेणारच..त्यांना शिव्या देऊन काय फायदा..तुझ्या कडे लायसन्स तरी होते,मी १७ वर्षे वयाच्या पोराला फोर्ड फिएस्टा चालवून पोलिसाने ३०० रुपयात सोडलेले पहिले आहे...साधे RTO गेलो की आपण system bypass करून एजंट कडे जातो...हे बदलू या..

आशिष देशपांडे said...

नमस्कार सिद्धार्थ,

तुम्ही तुमचा वेळ काढून माझी पोस्ट वाचली त्याबद्दल आभार! कसं आहे ना, आपण जनता आपलं घर आणि काम या दोन गोष्टी सोडून बाकीचा जास्त विचारच करत नाही. त्यामुळे अशा लोकांचं फावतं. मी कधीही कुठल्याही बाबतीत कायदा मोडत नाही, पण कधी कधी इतर गोष्टींमध्ये गर्क असल्याने चुका होतात. असो. सध्या महागाई इतकी वाढलीये, आणखीही बर्‍याच तत्सम गोष्टी चालू आहेत आपल्या राज्यात, देशात; त्यामुळे फुकटचे कुणाला पैसे द्यायचे म्हटले की डोकं फिरतं. या लोकांची अशी धारणा अशी झाली आहे की, लोकं यांच्यासाठीच कमावतात पैसे.
तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल आणि पाठिंबा दर्शविल्याबद्दल धन्यवाद! वेळ मिळाला की लागुयात कामाला.

Bajeerao Shinde said...

Hey ashish,

Actually since we are wrong at that time, we should accept our mistake and since even i got caught once for dumping signal.

It happens yaar.............

Bajeerao